पुढील ६ दिवसांपैकी ५ दिवस बंद असतील बँका


नवी दिल्ली : खातेधारकांना अनेकदा चेक क्लीयरन्स, सर्व प्रकारच्या कर्जाशी संबंधित सेवा आणि इतर अनेक आर्थिक कामांसाठी बँकेच्या शाखेत भेट द्यावी लागते. आपल्याला अशा परिस्थितीत हे माहित असावे लागते की ज्या दिवशी आपल्याला आपल्या बँकेतील कामे पूर्ण करायची आहेत. त्या दिवशी बँकांना सुट्टी तर नाही ना. पण तुम्हाला येत्या आठवड्यात बँकांच्या संपामुळे तुमच्या बँकिंगचे काम वेळेवर पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. तुमचे खाते सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकांमध्ये असल्यास तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. कारण आगामी सहा दिवसांपैकी पाच दिवस बँका या बंद राहणार आहेत.

11 मार्चला महाशिवरात्री आहे. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दिवशी बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर 13 मार्चला बँकांचा दुसरा शनिवार असल्याने या दिवशी सुट्टी असेल. 14 मार्चला रविवार असल्याने या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. तर 15 आणि 16 मार्चला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक संघटनांच्या संपामुळे बँका बंद राहतील.

11 मार्च ते 16 मार्च दरम्यान सहा दिवसांपैकी पाच दिवस बँका बंद राहतील. त्यापैकी 13 ते 16 मार्च दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहतील. येत्या सहा दिवसांत बँका फक्त शुक्रवारीच कार्यरत राहतील. तथापि, शुक्रवारी आपली आर्थिक कामे बँकेच्या शाखांमध्ये निकाली काढण्यासाठी आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. बँक 5 दिवस बंद राहिल्यामुळे 11 ते 16 मार्च दरम्यान बँकांचे कर्मचारी दीर्घ रजेवर जाऊ शकतात. अशा परिस्थितीत शुक्रवारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी राहण्याची शक्यता आहे.