‘रुही’ ठरणार सेलेब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचा शेवटचा चित्रपट

आज ११ मार्च रोजी दीर्घकाळानंतर थियेटर मध्ये एक बडा चित्रपट रिलीज होत आहे. जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरूण शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे ‘रुही’. विशेष म्हणजे सेलेब्रिटी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या आणि गुढ मृत्यू झालेल्या दिशा सालीयानचा हा शेवटचा चित्रपट असेल. दिशा वरूण शर्माची मॅनेजर म्हणून काम करत होती आणि चित्रपटाच्या शेवटी क्रेडीट मध्ये वरुणची दिवंगत मॅनेजर म्हणून दिशाचे नाव दाखविले जाणार आहे.

८/९ जून २०२० च्या रात्री दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंबईतील एका इमारतीतून दिशाने उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र तिने उडी मारली की ती अपघाताने पडली अथवा तिला कुणी ढकलले याचा खुलासा होऊ न शकल्याने तिचा मृत्यू संशयास्पद ठरला होता. त्या नंतर पाठोपाठ सुशांतसिंग राजपूत याचाही अकस्मात मृत्यू झाला होता. दिशाने काही काळ सुशांतची मॅनेजर म्हणूनही काम केले होते. मुंबई पोलिसांनी तपासानंतर दिशाची आत्महत्याच होती असा निष्कर्ष काढला होता.

वरूण शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर दिशा सह त्याचा एक फोटो शेअर केला असून त्याखाली फार चांगली व्यक्ती आणि माझी चांगली मैत्रीण असे म्हटले आहे.