येथे प्रथम लिंगस्वरुपात प्रकटले महादेव


फोटो सौजन्य याहू
महाशिवरात्रीनिमित्त काल देशात जागोजागी भोलेबाबाची पूजा अर्चना केली गेली. महादेवाचे पूजन लिंगस्वरुपात केले जाते. महादेवाचे पहिले लिंगस्वरूप तामिळनाडूच्या अन्नामलाई पर्वतातील अरुणाचलम येथे प्रकट झाले असे मानले जाते. येथे अरुणाचलम महादेवाचे प्रसिध्द मंदिर असून महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होते. तसेच नोव्हेंबर डिसेंबर या काळात येथे कार्तिगई दीपम या नावाचा उत्सव होतो तेव्हाही येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते.

कार्तिगई दीपमच्या दिवशी डोंगराच्या शिखरावर एक अग्नीपुंज पेटवला जातो. ते शिवाच्या अग्नीस्तंभाचे प्रतिक आहे. या मंदिरात आठ दिशांना आठ शिवलिंगे असून त्यांना वेगवेगळी नावे आहेत. ही शिवलिंगे राशींशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्या नुसार प्रत्येक राशीचे लोक येथे त्या त्या शिवलिंगाची पूजा करून दोष मुक्ती करून घेतात. इंद्रलिंगम हे वृषभ राशीसाठी, अग्नीलिंगम सिंह राशीसाठी, यमलिंगम वृश्चिक राशीसाठी, नैऋत्यलिंगम मेष राशीसाठी, वरूणलिंगम मकर व कुंभ राशीसाठी, वायूलिंगम कर्क राशीसाठी तर कुबेरलिंगम धनु व मीन राशीसाठी पुजले जाते.


फोटो सौजन्य इंडियामार्ट
या मंदिराची कथा अशी सांगतात, की एकदा शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर असताना पार्वतीने सहज शंकराचे डोळे झाकले. त्यामुळे एकदम ब्रह्मांडात अंधार झाला. अनेक वर्षे अशीच लोटली तेव्हा पार्वती आणि अन्य देवांनी येथे तपस्या केली तेव्हा शंकर येथे अग्नीपुंज रुपात प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी पार्वती शरीरात विलय होऊन अर्धनारीश्वर रुपात दर्शन दिले. या मंदिराजवळ अर्धनारीश्वर मंदिरही आहे.

Leave a Comment