येथे झाला होता शिवपार्वती विवाह


आज महाशिवरात्र, भोलेबाबच्या भक्तासाठी ही महापर्वणीच. शिवपार्वती हे जगाचे मातापिता मानले जातात. महाशिवरात्र दिवस हा त्यांचा विवाह दिवस म्हणून साजरा केला जातों. कैलासावर वास्तव्य असणार्‍या शिवाने पार्वतीसोबत लग्नाचे सात फेरे कुठे घेतले हे पाहायचे असेल तर त्यासाठी उत्तराखंड मधील रूद्रप्रयाग जिल्ह्यात जावे लागेल. या जिल्ह्यात त्रिजुगी किंवा त्रियुगी नारायण नावाचे एक गांव आहे व या गावातच शिवजी दुल्हा बनून आले होते. या विवाहस्थळावर मंदिर बांधले गेले आहे. विवाहावेळी चेतविलेला होम येथे आजही प्रज्वलित आहे. येथे येणारे भाविक येथे देवाला प्रसाद म्हणून लाकडे घेऊन या अग्नीकुंडात टाकतात.

असे मानले जाते की शिवाचा विवाह ब्रह्मदेवाने लावला. लग्न लावण्यापूर्वी ब्रह्माने जेथे स्नान केले ते ब्रह्मकुंड म्हणून ओळखले जाते. या विवाहाला विष्णु उपस्थित होते व त्यांनी पार्वतीच्या भावाची भूमिका पार पाडली होती. त्यांनीही येथे स्नान केले होते. अन्य देवदेवतांनी स्नान केलेले कुंड रूद्रकुंड म्हणून ओळखले जाते. ब्रह्मकुंडात स्नान केल्यास ब्रह्माचा आशीर्वाद मिळतो अशी भाविकांची भावना आहे.

येथे शिवपार्वती विवाहासाठी ज्या वेदीवर बसले तिचीही पूजा केली जाते. या लग्नात शिवाला गाय दिली गेली होती ती ज्या खांबाला बांधली होती तो स्तंभही दाखविला जातो. भाविकांची अशी श्रद्धा आहे की शिवपार्वतीच्या आजही प्रज्वलित असलेल्या होमातील राख घरी नेली तर ज्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असतील तर त्या दूर होतात. महाशिवरात्रीदिवशी येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात तसेच अन्य पर्यटकही या स्थानाला आवर्जून भेट देत असतात.

Leave a Comment