या मंदिरात पाहता येते शिव पार्वती मिलन


फोटो सौजन्य पत्रिका
हिमाचल ही देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. साहजिक येथे अनेक मंदिरे आहेत. त्यातील काही चमत्कारी आणि रहस्यमय आहेत. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात असेच एक प्रसिद्ध शिवमंदिर असून त्याला काठगढ महादेव मंदिर असे म्हटले जाते. या मंदिरातील शिवलिंग देशातील एकमेव असे शिवलिंग आहे ज्याचे दोन भागात विभाजन झाले आहे. असे मानले जाते की यातील एक भाग म्हणजे महादेव व दुसरा भाग म्हणजे पार्वती आहे.


यातील शिवलिंग ८ फुट उंचीचे आहे तर पार्वतीचा भाग ६ फुटी आहे. हे शिवलिंग अष्टकोनीय आहे. गृह नक्षत्राचा विचार करून हे मंदिर बांधले गेले आहे. आश्चर्याची बाब अशी की हिवाळ्यात ही दोन्ही लिंगे एकत्र होतात आणि जसजसा उन्हाळा वाढू लागेल तसे त्यांच्यातील अंतर वाढत जाते. हा चमत्कार प्रत्यक्ष पाहता येतो. महाशिवरात्रीला ही दोन्ही लिंगे एकरूप झालेली दिसतात. त्यानंतर त्यातील अंतर हळू हळू वाढत जाते. दरवर्षी येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते.

हे सिद्ध मंदिर मानले गेले आहे त्यामुळे अनेक भाविक श्रावणात येथे साधना करण्यासाठी येतात. प्राचीन समजुतीप्रमाणे ग्रीसचा सम्राट सिकंदर याने या शिवलिंगाचा चमत्कार पाहिल्यावर येथे मंदिर बांधले. भगवान रामाचा धाकटा भाऊ भरत याचे हे आवडते स्थान होते. त्याने येथे शिवआराधना केली होती. भरत त्याचे आजोळ कैकेय देशात जात असे तेव्हा या मंदिरात आराधना करत असे असेही सांगितले जाते.

Leave a Comment