फक्त महाशिवरात्रीला सर्वसामान्य भाविकांसाठी खुलते एकलिंगेश्वर मंदिर

motidungri
गुलाबी शहर जयपूर तेथील किल्ले आणि महाल याच्याबद्दल प्रसिद्ध आहे. याच शहरात या किल्ले, महालांपेक्षा खूप प्राचीन असे एकलिंगेश्वर महादेव मंदिर असून ते वर्षातून फक्त एकदा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वसामान्य भाविकांसाठी खुले असते.

हे मंदिर जयपूर राजघराण्याचे दैवत आहे. शिवरात्रीला राजघराण्याची पहिली पूजा होते. महाराणी गायत्रीदेवी हयात होत्या तोपर्यंत त्या येथे पहिला अभिषेक करत असत. नंतर बाकी जनतेला मंदिरात प्रवेश दिला जात असे. आताही या मंदिरावर शाही परिवाराचा अधिकार आहे. हे मंदिर मोती डुंगरी भागात असून त्याला शंकर गढी असेही म्हटले जाते. या पहाडाच्या खाली बिर्ला मंदिर आहे.

हे मंदिर जयपूर शहर वसविले जाण्यापूर्वी[पासून आहे असे सांगतात. या मंदिरात शिवलिंगासोबत शिव परिवाराची स्थापना केली गेली होती. मात्र असे सांगतात की काही काळानंतर शिवपरिवारातील मूर्ती नाहीश्या झाल्या. या मूर्ती पुन्हा नव्याने स्थापन केल्या गेल्या मात्र त्याही नाहीशा झाल्या. तेव्हा भीतीने पुन्हा या मूर्ती मंदिरात स्थापन केल्या गेल्या नाहीत. दरवर्षी श्रावणात येथे सहस्त्रघट रुद्राभिषेक केला जातो. शिवरात्रीच्या एकाच दिवशी येथे सर्वसामान्य जनतेला दर्शन मिळत असल्याने रात्रीपासून येथे भाविक रांगा लावतात असे समजते.

Leave a Comment