प्रिन्स हॅरी, मेगन मर्केलची मुलाखत घेऊन विनफ्रे झाली मालामाल

 

फोटो साभार रॉयटर

ब्रिटीश राजघराण्याचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल यांची सेलेब्रिटी टॉक शो मध्ये ऑपरा विनफ्रे हिने घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आली असताना विनफ्रे या मुलाखतीमुळे मालामाल झाल्याची बातमी आली आहे. टीव्ही चॅनल सीबीसीवर ही मुलाखत प्रसारित झाली होती. या चॅनलने ही मुलाखत प्रसारित करण्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी विनफ्रे हिला ५१ ते ६५ कोटी रुपयांच्या दरम्यान रक्कम दिल्याचा रिपोर्ट वॉल स्ट्रीट जर्नलने दिला आहे.

या मुलाखतील मेगन हिने ब्रिटीश राजघराण्यावर वर्णद्वेष करत असल्याचा आरोप केला होता तसेच प्रिन्स हॅरीने वडील प्रिन्स चार्ल्स त्याचे फोन कधीच उचलत नाहीत असे वक्तव्य केले होते. या मुलाखतीमुळे अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे झाल्याचे सांगितले जात आहे. अर्थात सीबीसी चॅनलला या मुलाखातीतून चांगलाच फायदा झालाच पण विनफ्रे हिलाही भारी भक्कम पैसा मिळाला. विशेष म्हणजे प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना मात्र मुलाखतीसाठी पैसे दिले गेले नाहीत असेही सांगितले जात आहे.

६७ वर्षीय विनफ्रे टॉक शो होस्ट करण्याबरोबरच टीव्ही प्रोड्युसर, अभिनेत्री, लेखिका म्हणूनही प्रसिध्द आहे. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या विनफ्रेचे आयुष्य संघर्षमय राहिले आहे. फोर्ब्समध्ये दिल्या गेलेल्या माहितीनुसार विनफ्रे हिची संपत्ती १९७०० कोटी रुपये आहे.