एका रात्रीत बांधले गेलेले देवसोमनाथ मंदिर
आज देशभर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. भारतात हजारोंच्या संखेने शिवमंदिरे आहेत आणि आजच्या दिवशी सर्व शिवमंदिरातून भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. राजस्थान मध्ये उदयपूर, डूंगरपुर सीमेवरील सोम नदीकाठी असलेले प्राचीन देवसोमनाथ मंदिर असेच जगभर प्रसिद्धी पावलेले मंदिर आहे.
१२ व्या शतकातील हे तीन मजली भव्य मंदिर एका रात्रीत बांधले गेल्याचे सांगितले जाते. मंदिर पूर्ण दगडी असून बांधकामात वाळू, चुना अथवा विटेचा वापर केला गेलेला नाही. मंदिरातील शिलालेख सांगतात हे मंदिर राजा अमृतपाल देव याने बांधले मात्र पुजारी लोकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर आणि शिवलिंग स्वयंभू आहेत. मंदिर १४८ दगडी खांबांवर उभे असून या खांबांवर अतिशय बारीक कलाकुसर केली गेली आहे. मंदिरच्या घुमटावर सुद्धा अतिशय सुंदर कलाकुसर आहे ही कलाकुसर या मंदिराचे आकर्षण आहे.
मंदिराच्या गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. त्यातील मुख्य शिवलिंग रुद्राक्षाच्या आकाराचे आहे तर दुसरे स्फटिकाचे आहे. पुजारी सांगतात या दोन्ही शिवलिंगांचे आकार हळू हळू वाढत आहेत. स्फटिक लिंग फार पूर्वी लिंबाएवढे होते ते आता नारळाएवढे झाले आहे. पांढऱ्या संगमरवरात बांधले गेलेले हे मंदिर आता जीर्ण झाल्याने पिवळे पडले असून त्याची देखभाल भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. मात्र मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचे चिरे निखळू लागले आहेत.
मंदिरातील खांबांवर कलाकुसरी बरोबरच देव देवतांच्या अनेक सुंदर मूर्ती कोरल्या गेल्या आहेत. हे मंदिर माळवा शैलीत बांधले गेले आहे.