देशातील दोन कोटी 40 लाख नागरिकांना आतापर्यंत देण्यात आली कोरोनाची लस


नवी दिल्ली : एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरु झाला असून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने आता वेग घेतल्याचे दिसून येत आहे. देशातील दोन कोटी 40 लाख नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. रिपोर्टनुसार 2,40,37,644 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या 53 व्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत 10 लाख 28 हजार 911 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 98 हजार 354 लोकांना पहिल्यांदा लस देण्यात आली. 2 लाख 30 हजार 557 आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्स यांना कोरोनाची लस देण्यात आली. लस घेतलेल्यांपैकी 5 लाख 51 हजार 398 नागरिक हे 60 वर्षापेक्षा जास्त असून 98 हजार 478 हे वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचेही पहायला मिळाले.

एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात लसीकरणासाठी आपले नांव नोंद करु शकते. कोरोनाची लस ज्या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे त्या-त्या राज्याने त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.