मेगन मार्केलच्या गंभीर आरोपांना राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे उत्तर


ब्रिटन – ब्रिटीश राजघराणे सध्या प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केलने केलेल्या गंभीर आरोपांनंतर चर्चेत आहे. मेगल मार्केलने पती प्रिन्स हॅरीसोबत ओपरा विन्फ्रेला दिलेल्या एका मुलाखतीत राजघराण्याला आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता होती असा खुलासा केला होता. तसेच आपल्या मनात राजघराण्यात असताना सतत आत्महत्येचे विचार येत असल्याचाही गौप्यस्फोट केला होता. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले असून प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्याबाबत चिंता आणि सहानुभूती व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हॅरी आणि मेगन यांच्यासाठी गेली काही वर्ष कितपत आव्हानात्मक होती, हे समोर आल्यानंतर कुटुंबाला त्यांच्यासंबंधी चिंता सतावत आहे. जे मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि त्यातही खासकरुन रंगाचा, तो खूप चिंता निर्माण करणारा आहे. काही गोष्टींमध्ये मतांतर असू शकते. पण हे सर्व गांभीर्याने घेण्यात आले असून यासंबंधी कुटुंब खासगीत चर्चा करेल, असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी हॅरी, मेगन आणि आर्ची हे नेहमीच कुटुंबातील प्रिय सदस्य असतील, असेही स्पष्ट केले.