‘गो कोरोना गो’ म्हणणारे रामदास आठवले घेणार कोरोना प्रतिबंधक लस


मुंबई : महाराष्ट्र आणि भारतात गेल्यावर्षी याच काळात कोरोना व्हायरसने शिरकाव केला. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढत गेला की, देशात मुंबई आणि महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनला. याच दरम्यान कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक नारा दिला. हातात मेणबत्ती घेऊन ‘गो कोरोना गो’चा नारा रामदास आठवले यांनी दिला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील खूपच व्हायरल झाला होता. आता हेच रामदास आठवले कोरोना प्रतिबंधक लस घेणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले हे कोरोना प्रतिबंधक लस घेणार आहेत. १२ मार्च २०२१ रोजी दुपारी २ वाजता रामदास आठवले कोरोना प्रतिबंधक लस घेणार आहेत.

‘गो कोरोना गो’ चा नारा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देणाऱ्या रामदास आठवले यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रामदास आठवले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता मात्र, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यानंतर वैद्यकीय उपचार घेऊन रामदास आठवले हे कोरोनामुक्त झाले. सुरुवातीला रामदास आठवले होम क्वारंटाईन होते. पण उपचारासाठी ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले. तेथे उपचार घेतल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते.