मुंबईत लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या चर्चांना पालिका आयुक्तांनी दिले उत्तर


मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारला चिंता सतावत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अमरावती अशा अनेक ठिकाणी प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून लॉकडाऊन लागू करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान मुंबईत लॉकडाऊन लावण्यासंबंधी प्रशासनाची भूमिका पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केली आहे. यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

सध्या मुंबईत लॉकडाऊन लागू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढल्याचे यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सध्या महानगरपालिकेने कोरोना चाचण्यांची संख्या २० हजारांपर्यंत वाढवली आहे. जानेवारीत जवळपास ११ ते १५ हजार चाचण्या होत होत्या. दरम्यान महापालिकेने नागरिकांना कोरोनासंबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे जर योग्य पालन केले नाही, तर पालिकेने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.