पुणे – अखेर आपल्या प्रथम सत्राच्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जवळपास एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता प्रथम सत्राच्या परीक्षेवरुन निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आला आहे. ११ एप्रिलपासून विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. २५ मार्च रोजी याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
कन्फर्म ! ११ एप्रिलपासून सुरू होणार पुणे विद्यापीठाच्या परीक्षा
पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा यापूर्वी मार्च महिन्यात होणार होती. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यापूर्वी १५ मार्चपासून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता. पण परीक्षेच्या कामासाठी एजन्सी निवडीवरून मतभेद असल्याने महिन्याभरात निर्णय झाला नव्हता. त्यामुळे परीक्षेचे ठरलेले वेळापत्रक कोलमडून गेल्यामुळे मंगळवारी पुन्हा परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलपासून घेण्याचे निश्चित झाले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून त्यात ५० गुणाचे बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू ) विचारले जातील. ही परीक्षा विद्यापीठाची स्वतःची एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन कंपनी घेणार आहे. यापूर्वी निर्णयानुसार २० गुणांचे लेखी स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे एका कागदावर लिहून त्या कागदाचा फोटो विद्यापीठाने दिलेल्या संकेत स्थळावर अपलोड करावा लागणार होता. पण २० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ५० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. २५ मार्च रोजी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षांबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम अखेर दूर झाला आहे.