भारताचा गुआना, मेक्सिकोतून कच्चे तेल खरेदीचा विचार
तेल निर्यात देश संघटना ओपेक आणि रशिया सह अन्य सहकारी तेल उत्पादक देशांनी कच्चे तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारताने तेल आयात धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. भारत ओपेक आणि मध्य पूर्व देशांवर कच्च्या तेलासाठी प्रामुख्याने अवलंबून आहे मात्र आता भविष्यात हे अवलंबित्व कमी करण्याचा विचार केला जात आहे.
भारत एकूण तेल गरजेच्या ८४ टक्के तेल आयात करतो आणि त्यात ६० टक्के तेल मध्य पूर्वेतील देशातून आयात केले जाते. मध्यपूर्वेतील तेल पश्चिम देशातील तेलाच्या तुलनेत स्वस्त पडते. इराक आणि सौदी भारताला मोठ्या प्रमाणात तेल पुरवितात. पण गेल्या आठवड्यात या देशांनी तेलाचे उत्पादन न वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाला भारताने तेल उत्पादन वाढविण्यची केलेली विनंती अमान्य केली गेली आहे.
भारताने साठविलेल्या कच्या तेल साठ्याचा वापर करावा असा पर्याय सौदीने सुचविला आहे मात्र साठविलेले कच्चे तेल युद्धासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीच वापरले जाणार आहे. त्यामुळे गुआना आणि मेक्सिको बरोबर तेल खरेदी करार करण्याचा विचार केला जात आहे. मेक्सिको बरोबर भारताने ६ दशलक्ष टन तेल खरेदीचा करार यापूर्वीच केला आहे. अमेरिकेने इराकवरील बंदी उठविली तर भारताला मोठा दिलासा मिळणार आहे असेही सांगितले जात आहे. सध्या कच्या तेलाचे दर प्रती बॅरल ७० डॉलर्सवर गेले आहेत. भारताने एप्रिल २०२० मध्ये करोना काळात २० डॉलर्स प्रती बॅरल दराने तेल खरेदी केलेली आहे.