पाकिस्तानला भारतातून मिळणार करोना लस

भारतात तयार होत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या करोना लसीचे ४.५ कोटी डोस पाकिस्तानला मिळणार आहेत. द ग्लोबल अलायंस ऑफ वॅक्सीन अँड इम्युनायझेशन (जीएव्हीआय) च्या माध्यमातून पाकिस्तानला हे डोस मोफत दिले जाणार आहेत. गरीब देशांना करोना लस मोफत पुरविण्यासाठी वरील संस्था स्थापन करण्यात आली आहे. पाकिस्तानला कोविड १९ लसीचे डोस मार्चच्या मध्यापासून उपलब्ध केले जाणार आहेत.

भारत जगभरातील ६५ देशांना कोविड १९ लस उपलब्ध करून देत आहे. त्यातील काही गरीब देशांना ही लस वरील संस्थेच्या माध्यमातून मोफत पुरविली जाणार आहे तर बाकी देश भारत सरकारने ठरविलेली किंमत देऊन लस विकत घेणार आहेत. श्रीलंका, भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स या देशांना अनुदानापोटी ५६ लाख डोस उपलब्ध केले जाणार आहेत.

दरम्यान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ९ मार्चला एका दिवसात २० लाखापेक्षा जास्त नागरिकांना करोना लस दिली गेली आहे. जगात सर्वाधिक वेगाने भारतात कोविड लसीकरण केले जात असून आत्तापर्यंत सुमारे तीन कोटी लोकांचे लसीकरण केले गेले आहे. त्यात फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे.