करोना टेस्ट आणि मास्टरब्लास्टर सचिनची किंकाळी व्हायरल
क्रिकेटचा भगवान अशी प्रसिद्धी असलेल्या सचिन तेंडूलकरने करोना टेस्ट दरम्यान किंकाळी फोडल्याने ही टेस्ट करणाऱ्या मेडिकल स्टाफची चांगलीच घाबरगुंडी उडाली. सचिनने या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत.
मंगळवारी सचिनची इंग्लंड लीजंटस विरुद्ध सामना खेळण्यापूर्वी करोना टेस्ट केली गेली. या संदर्भातला व्हिडीओ सचिनने सामन्याच्या काही तास अगोदर पोस्ट केला आहे. त्यात सचिन खुर्चीत बसलेला दिसत असून त्याच्या नाकातून स्वॅब् घेतला जात आहे. त्यावेळी सचिन जोरात ओरडताना दिसतो आहे पण काही वेळात सर्वजण हसत असल्याचे दिसते आहे. सचिनने कॅप्शन लिहिताना वातावरण थोडे हलके व्हावे म्हणून मेडिकल स्टाफची थोडी मस्करी केल्याचे म्हटले आहे.
सुरवातीला टेस्ट करणाऱ्या मेडिकल स्टाफ मध्ये सचिन ओरडल्याने थोडी घबराट होती पण सचिननेच मजा केल्याचा खुलासा केल्यावर सर्व जण हसताना दिसत आहेत. सचिन लिहितो २०० सामने खेळले आणि २२७ करोना टेस्ट केल्या. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम. मंगळवारच्या सामन्यात सचिनने ९ चेंडूत ९ धावा काढल्या पण या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.