एलन मस्क बनविणार २० हजार घरांना वीज पुरवू शकेल अशी बॅटरी

अमेरिकेच्या टेक्सास राज्यात गेल्या महिन्यात ओढविलेल्या भीषण वीज संकटाचा त्रास सोसाव्या लागलेल्या एलन मस्क यांनी विशाल बॅटरी निर्मिती प्रकल्प हाती घेतल्याचे वृत्त असून या  बॅटरीत साठविली गेलेली वीज आणीबाणीच्या परिस्थितीत २० हजार घरांना वीज पुरवू शकेल असा दावा केला जात आहे. ही विशाल बॅटरी टेक्सास पॉवर ग्रीड मध्ये प्लग केली जाणार आहे.

टेक्सास मध्ये ओढविलेल्या वीज संकटामुळे टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना रात्र कारमध्ये घालविण्याची वेळ आली होती. टेस्लाची सहकंपनी गॅब्रीज एनर्जी स्टोरेज टेक्सास मध्ये एक बॅटरी एनर्जी प्रोजेक्ट सुरु करत आहे. हीच कंपनी टेस्ला साठी बॅटरी निर्मिती करते. या प्रोजेक्ट मध्ये सुरवातीला १०० मेगावॉट वीज स्टोर करण्याची सुविधा दिली जाणार असून त्यातून उन्हाळ्यात २० हजार घरांना वीज पुरवठा होऊ शकणार आहे.

ही विशाल बॅटरी थेट ग्रीड मध्येच चार्ज केली जाणार आहे. असेही सांगितले जात आहे की कंपनीने हा प्रोजेक्ट अज्ञात खरेदीदाराला विकला आहे. टेस्ला कडून या संदर्भात अधिकृत खुलासा केला गेलेला नाही. मात्र प्रोजेक्ट साईटवर टेस्लाचा लोगो दिसत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बॅटरी लिथियम आयन बॅटरी असेल आणि दूर अंतरावरून तिची देखभाल करता येणार आहे.

ऑस्ट्रेलियात टेस्लाने यापूर्वीच अशी बॅटरी योजना राबविली असून २०१७ पासून ती कार्यान्वित आहे. येथे पवनउर्जेवर टर्बाईन मधून जास्तीची वीज साठविली जाते. ही योजना यशस्वी ठरल्याने टेस्लाचा उत्साह वाढला आहे आणि अमेरिकेत असाच प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.