सर्वात आधी मुंबईतील नाईट क्लब बंद करण्याचे पालकमंत्र्यांचे संकेत


मुंबई: मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण या दोन्ही शहरांमध्ये सापडत आहेत. मुंबईच्या नाईट क्लबमध्ये तर कोरोना नियमावलीचा अक्षरशः फज्जा उडालेला असल्यामुळे सर्वात आधी नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.

अस्लम शेख यांनी हे संकेत विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत. नाईट क्लबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. काही नाईट क्लबवरही कारवाई करण्यात आली आहे. पण त्याने काहीही फरक पडलेला नाही, असे सांगतानाच मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे शेख म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी काल कोरोना आढावा बैठक घेतली. जिथे जिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंध लावण्यात येणार आहेत. तसे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई आणि ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून आहे. या बैठकीत लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसमधील गर्दीवरही चर्चा झाली. तसेच लग्न समारंभांवरही चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. रात्री अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे आढळून आल्यामुळे रात्रीची संचाबंदी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्या ज्या ठिकाणी राज्यात गर्दी होत आहे, त्या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात. त्याबाबत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे सांगतानाच कोरोना केसेस वाढत असल्या तरी लॉकडाऊन हा त्यावर पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.