ठाणे महापालिकेचे आवाहन; अफवांना बळी पडू नका


ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही, तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॉटस्पॉटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. निर्बंध या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे मनपा हद्दीतील प्रत्येक भागातील कोरोनाबाधितांचा दररोज आढावा घेतला जात आहे. ज्या भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे, अशा भागांमध्ये लॉकडाऊन नाही. पण जिथे रुग्णसंख्या वाढत आहे, अशा ठिकाणांना हॉटस्पॉट जाहीर करुन तिथे निर्बंध घातल्याची माहिती ठाणे मनपाने दिली.