मागील १० महिन्यात देशातील १० हजार ११३ कंपन्यांचे शटर डाऊन


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्याची माहितीसमोर आली असून कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील दहा हजार ११३ कंपन्या एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये बंद झाल्या आहेत. केंद्राने कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचे स्पष्ट केले आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठे कारण हे देशात लागू करण्यात आलेला लॉकडाउन असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील आर्थिक व्यवहारांना लॉकडाउनमुळे खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या.

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीपर्यंतच्या चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. कलम २४८ (२) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने या आकडेवारीसंदर्भातील वृत्त दिले आहे.

कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सोमवारी लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना, आपल्या व्यवसायामधून ज्या कंपन्या बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्याचेही ठाकुर यांनी स्पष्ट केले. कंपन्यांविरोधात मंत्रालयाने कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आल्या नसल्याचेही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक म्हणजेच दोन हजार ३९४ कंपन्या दिल्लीमध्ये बंद पडल्या. त्या खालोखाल एक हजार ९३६ कंपन्या उत्तर प्रदेशमध्ये बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू (१३२२ कंपन्या), महाराष्ट्र (१२७९ कंपन्या) आणि कर्नाटक (८३६ कंपन्या) या तीन राज्यांचा अव्वल पाच राज्यांच्या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येक ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या बंद पडल्या आहेत. याचप्रमाणे झारखंडमधील १३७ कंपन्यांना, मध्य प्रदेशमधील १११ कंपन्यांना आणि बिहारमधील १०४ कंपन्यांना एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये टाळे लागले. इतर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांबद्दल बोलायचं झाल्यास मेघालयमध्ये ८८, ओदिशामध्ये ७८, छत्तीसगडमध्ये ४७, गोव्यात ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१, गुजरातमध्ये १७, पश्चिम बंगालमध्ये चार तर अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्या आहेत.

केंद्र सरकारने २०२० च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळेच कंपन्यांना सर्व नियमांचे पालन करुन मे महिन्यापासून हळूहळू काम करण्यास सुरुवात करावी लागली. या लॉकडाउनमुळे कंपन्यांना मोठे नुकसान झाल्यामुळेच हजारो कंपन्यांनी आपला कारभार बंद केला.