अन् रितेश-जेनेलियाने महाराष्ट्र सरकारचे ‘या’ निर्णयासाठी मानले आभार


मुंबई : सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारने या अर्थसंकल्पात एक महत्वाचा निर्णय घेतला. यामुळे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा- देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्र आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

वाहतूक कोंडी हा मुंबईत महत्वाचा मुद्दा आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एक संकल्पना मांडली होती. या संकल्पनेत विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाची (‘ईस्टर्न फ्री वे’) संकल्पना मांडली होती. त्यांनी या मांडलेल्या संकल्पनेमुळेच हा मार्ग तयार झाला.


माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव या मार्गाला देण्याची मागणी २०२० साली पत्राद्वारे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत सोमवारी अर्थसंकल्पात ही घोषणा जाहीर करण्यात आली. या मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले.

ईस्टर्न फ्री वे ची लांबी १६.८ कि.मी आहे. दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोडपासून ते चेंबुर येथील पूर्व द्रूतगती मार्गास हा मार्ग जोडला जातो. हा रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात असून याला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे.