रणबीर कपूरला कोरोनाची लागण, आई नीतू कपूर यांनी दिली माहिती


अभिनेता रणबीर कपूरची तब्येत खराब असल्याचे त्याचे काका रणधीर कपूर यांनी काही वेळापूर्वीच सांगितले होते. पण त्याला त्यावेळी कोरोनाची लागण झाल्याचे नक्की सांगण्यात आले नव्हते. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी दिली आहे. रणबीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तो सध्या घरीच विलगीकरणात आहे आणि त्याची तब्येत व्यवस्थित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


त्यांनी यासोबतच चाहत्यांचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. आता त्या बऱ्या झाल्या आहेत. रणबीर अभिनेत्री आलिया भटसोबत ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या बद्दलचे फोटोजही पोस्ट केले होते.

आपल्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण रणबीरने नुकतेच पूर्ण केले आहे. एक म्हणजे ‘ब्रम्हास्त्र’ यात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चनही दिसणार आहेत आणि दुसरा म्हणजे ‘शमशेरा’. रणबीर सध्या ‘ऍनिमल’ आणि लव रंजनच्या एका चित्रपटात दिसणार आहे ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.