मुंबई : कोरोनाचे संकट राज्यात दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाबाधित सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा, जळगाव आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
जळगावात जनता कर्फ्यू
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा या 3 दिवसात बंद राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेने जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे.
११ मार्च रोजी रात्री 8 पासून शहराच्या हद्दीत जनता कर्फ्यू सुरू होणार आहे. तो १५ मार्च रोजी सकाळी 8 वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यूसाठी व्यापारी आणि जनतेनं यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.