रेल्वे प्रवासादरम्यान तक्रार, चौकशी, मदतीसाठी ‘या’ एकाच नंबरवर करा कॉल


नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अजून सुखकर होण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेमध्ये याआधी मदतीसाठी वेगळा क्रमांक, तक्रारींसाठी भिन्न क्रमांक आणि चौकशीसाठी वेगळाच नंबर अशी अवस्था होती. प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध समस्या आणि आवश्यक चौकशांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याच्या गैरसोयीपासून रेल्वे प्रवाशांची सुटका करण्याच्या उद्देशाने, प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या उद्भवल्या किंवा काही चौकशी करावयाची असेल तर त्यासाठी भारतीय रेल्वे विभागाच्या 139 या एकाच एकीकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

सध्या परिचलनात असलेल्या रेल्वेच्या सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता 139 हा एकच क्रमांक अस्तित्वात आला आहे. गेल्या वर्षी रेल्वे विभागाच्या तक्रार निवारण हेल्पलाईन्स खंडित करण्यात आल्या. आता, 182 हा सध्या परिचालनात असलेला हेल्पलाईन क्रमांक देखील येत्या 1 एप्रिल 2021 पासून खंडित होईल आणि त्यावरील सेवा 139 क्रमांकाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विसर्जित होतील. 12 भाषांमध्ये हेल्पलाईन क्रमांक 139 च्या सेवा उपलब्ध असतील. प्रवाशांना आयव्हीआरएस प्रणालीद्वारे ही सेवा वापरता येईल किंवा फोन वरील * (अस्टेरीस्क) हे चिन्ह दाबून कॉल सेंटर मधील सहाय्यकाशी प्रत्यक्ष बोलता येईल.

139 या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी स्मार्ट फोन उपलब्ध असण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे फोन वापरणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. सध्या 139 या हेल्पलाईन क्रमांकावर चौकशीसाठी सरासरी प्रतिदिन 3,44,513 कॉल अथवा संदेश येत आहेत.

आयव्हीआरएस प्रणालीनुसार कशा प्रकारे वापरू शकता 139 हा हेल्पलाईन क्रमांक –

  • प्रवाशांनी 1 क्रमांक सुरक्षिततेविषयी किंवा वैद्यकीय मदतीसाठी दाबायचा आहे. यामुळे त्यांना त्वरित कॉल सेंटरमधील प्रतिनिधीशी बोलता येईल.
  • रेल्वेविषयी कोणत्याही चौकशीसाठी 2 क्रमांकाचे बटण दाबल्यानंतर प्रवाशांना मिळणाऱ्या पुढील सूचनांद्वारे पीएनआर स्थिती विषयी माहिती, गाडीची स्टेशनवर येण्याची तसेच सुटण्याची निश्चित वेळ, जागांची उपलब्धता, तिकीट शुल्काची माहिती, तिकीट आरक्षण तसेच आरक्षण रद्द करण्याच्या नियमांची माहिती, गजराची सुविधा तसेच गंतव्य स्थानकाविषयी इशारा, व्हील चेअरचे आरक्षण, जेवणाची ऑर्डर इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल.
  • 4 हे बटण सामान्य तक्रारीसाठी प्रवाशांनी दाबावे.
  • प्रवाशांनी 5 हे बटण दक्षतेबाबतच्या तक्रारीसाठी दाबावे.
  • प्रवाशांनी 6 हे बटण पार्सल आणि वस्तूंच्या वाहतुकीशी संबंधित चौकशीसाठी दाबावे.
  • प्रवाशांनी 7 हे बटण आयआरसीटीसी संचालित गाड्यांच्या चौकशीसाठी दाबावे.
  • 9 हे बटण प्रवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या विद्यमान स्थितीविषयी जाणून घेण्यासाठी दाबावे.
  • प्रवाशांनी कॉलसेंटर मधील प्रतिनिधीशी बोलण्यासाठी * (अस्टेरीस्क) हे चिन्ह असलेले बटण दाबावे.
  • प्रवाशांना नव्या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती रेल्वे मंत्रालयाने देऊन त्याच्या वापराविषयी प्रशिक्षण देण्यासाठी सोशल मीडियावर #OneRailOneHelpline139 हे अभियान देखील सुरु केले आहे.