मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंच्या ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा


मुंबई – आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 वा वर्धापन दिन असून मनसेने सध्या महाराष्ट्रात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून मनसे कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किल्ल्याला तोरण माळा, उगवता सूर्य आणि भरारी घेणारा पक्षी या सांकेतिक चिन्हांमधून मनसेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा उत्साह आणि काम करण्याची उर्मी भरण्यासाठी संदेश दिल्याचे म्हटले जात आहे.


विधानसभेमध्ये मनसे पक्षाकडे अवघा 1 आमदार असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये मनसेने मोठी भरारी घ्यावी यासाठी सध्या मनसेकडून प्रयत्न सुरू आहेत. मनसेकडून वर्षभरापूर्वीच पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्त्वाची कास धरत असल्याचे पहायला मिळाले. 2022 साली मुंबई महानगरपालिका निवडणूकांसाठी मुंबईमध्ये मनसेचा एक नेता एक सरचिटणीस अशी टीम काम करत आहे.

दरम्यान मनसेच्या बैठकीमध्ये काही दिवसांपूर्वी राज ठाकरे या आठड्यात अयोद्धा दौऱ्यावर जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते, पण सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांचा अयोद्धा दौरा देखील अद्याप जाहीर झालेला नाही.