महाराष्ट्राचे राज्यपाल होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री!


नवी दिल्ली – नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत असतात. आता थेट मुख्यमंत्रीपदी भगतसिंह कोश्यारी यांची वर्णी लागू शकते. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरूद्ध भाजप आमदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असल्यामुळे उत्तराखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

सध्या दिल्लीत उत्तराखंडचे अनेक आमदार आणि मंत्री तळ ठोकून बसले आहेत. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्षनेतृत्वाकडून रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. परंतू आणखी याबद्दल अधिकृत घोषणा झाली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी रावत यांनी चर्चा केली आहे.

तर दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने दोन दिवसांपूर्वी रमणसिंग आणि दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडच्या दौऱ्यावर पाठवले होते. 45 आमदारांशी त्यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल राष्ट्रीय कार्यकारणीकडे दिला. त्यानंतर आज अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती आहे.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांना या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते. उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर आतापर्यत फक्त एकाच मुख्यमंत्र्याला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता. तर कोणताही मुख्यमंत्री न बदलता पुढील निवडणुक लढवण्याची पद्धत भाजपमध्ये असल्यामुळे आता भाजप काय निर्णय घेईल याची प्रतिक्षा असेल.