पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत आतापर्यंत उघडण्यात आली 41.93 कोटी खाती


नवी दिल्ली : 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत एकूण 41.93 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. त्यामध्ये 55 टक्के बँक खाती महिलांच्या नावे असल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे. अर्थमंत्रालयाने सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अशा अनेक योजनांची आकडेवारी जाहीर केली, ज्यामध्ये महिलांचा विकास होत आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या योजनांमुळे महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या महिला या सक्षम होत आहेत. त्यामुळे अनेक महिला या उद्यमी महिला म्हणून समोर आल्या असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान मुद्रा योजनेची माहिती देताना सांगितले की 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत या योजनेच्या माध्यमातून उद्यमी महिलांना 68 टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. एकूण 19.04 महिलांच्या बँक खात्यात 6.36 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनधन योजनेची सुरुवात केली होती. यामध्ये प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्याचे लक्ष होते. कोरोनाच्या काळात नागरिकांना विशेषत: महिलांना सरकारच्या योजनांचा फायदा या जनधन खात्यामुळे झाला. याच योजनेमुळे कोरोना काळात महिलांच्या खात्यावर सरकारकडून पैशांचे थेट हस्तांतर करण्यात आले. तसेच देशाच्या अतिदुर्गम भागातही जनधन योजनेमुळे सरकारच्या आर्थिक योजना प्रभावीपणे पोहचण्यास मदत झाली. या योजनेमध्ये आता रुपे कार्डची सुविधा देण्यात आली असून त्या अंतर्गत विमा कव्हर दुप्पट करण्यात आला आहे.