महिला दिनी मोदींनी केली खास खरेदी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना शुभेच्छा देतानाच पंतप्रधान मोदी यांनी या निमित्ताने काही खास खरेदी केली आहे. याची माहिती खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवर दिली आहे.

पंतप्रधानांनी महिला स्वयंसहाय्य गट चालविणाऱ्या संस्थांकडून या दिवशी काही खास वस्तू खरेदी केल्या आहेत. या संदर्भात केलेल्या ट्विट मध्ये मोदी म्हणतात, आसामचा गामुसा मी बरेचदा वापरतो, अतिशय आरामदायी असतो यामुळे आज काकातीपपुंग विकास खंड विविध स्वयंसहाय्य गटा मधून गामुसा खरेदी केला. ही सर्व उत्पादने महिलांनी बनविलेली आहेत असे नमूद करताना मोदींनी त्या वस्तूंच्या खासियती सांगितल्या आहेत.

पंतप्रधानांनी बंगालचे ज्यूट फाईल फोल्डर, गमछ्या, तामिळनाडू टोडा आदिवासी शाल, नागालँडची प्रसिद्ध शाल, मधुबनी पेटिंग अशीही खरेदी केले आहे. नारी शक्ती हॅशटॅग सह मोदींनी हे ट्विट केले असून महिलांनी सातत्याने समाजाला पुढे नेण्याचे कार्य केल्याचे नमूद केले आहे.

मोदींनी केलेल्या या खास खरेदीला राजकीय अर्थ दिला जात असून बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकींचा संदर्भ त्यासाठी दिला जात आहे.