बंगाल निवडणुकात मोदी, ममता मिठाईची क्रेझ

एप्रिल मध्ये होणाऱ्या प.बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे साऱ्या देशाचे लक्ष केंद्रित झाले असून या काळात सत्ताधारी, विरोधी पक्षात आरोप, प्रत्यारोपांची एकच घमासान सुरु आहे. परिणामी राज्यातील वातावरण गढूळ बनले आहे. मात्र येथील प्रसिद्ध बलराम मल्लिक मिठाईवाल्यांनी या वातावरणात गोडवा आणण्याचा एक खास प्रकार सादर केला आहे. या दुकानात चक्क मोदी, ममता यांच्या प्रतिमा असलेल्या मिठाया तसेच राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे असलेल्या मिठाया बनविल्या गेल्या असून त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बालाराम मल्लिक यांच्या नावाचे हे दुकान १८८५ मध्ये सुरु झाले आहे. सध्या हे दुकान सुदीप मल्लिक पाहतात. पूर्ण बंगाल मध्ये या दुकानातील खास मिठाया लोकप्रिय आहेत. सुदीप सांगतात, सोशल मीडियावर काय ट्रेंड आहे ते पाहून आम्ही  आमच्या खास मिठाया तयार करतो. सध्या सोशल मीडियावर बंगाल निवडणूक हा विषय जोरात आहे त्यामुळे आम्ही ममता, मोदी, पक्ष चिन्हे याच्या मिठाया तयार केल्या आहेत. मोदी संदेश, ममता संदेश या नावाने या मिठाया उपलब्ध असून त्याला ग्राहक भरभरून प्रतिसाद देत आहेत. संदेश हे एका बंगाली मिठाईचे नाव आहे.