कोट्यवधी शिवलिंगे असणारे अनोखे कोटीलिंगेश्वर मंदिर
महाशिवरात्रीचा उत्सव आता अगदी तोंडावर आला असून या दिवशी देशभरातील भाविक विविध शिवालयात दर्शनासाठी गर्दी करतील. भारतात अनेक शिवमंदिरे आहेत आणि त्यातील काही खास वैशिष्ठे असलेली आहेत. असेच एक मंदिर कर्नाटकात कोलार जिल्ह्यातील काम्मासांदरा या छोट्याश्या गावात आहे. हे मंदिर शिवलिंगाच्या आकारात असून त्याला कोटीलिंगेश्वर मंदिर असे म्हटले जाते.
या मंदिरात जगातील सर्वात उंच शिवलिंग आहे. त्याची उंची १०८ फुट असून या शिवलिंगाच्या चारी बाजूंनी १ कोटी पेक्षा जास्त छोटी मोठी शिवलिंगे आहेत. येथे येणाऱ्या शिवलिंगांची संख्या रोज वाढते. याचे कारण असे की भाविक त्यांची मनोकामना पूर्ण झाली की ऐपतीप्रमाणे एक ते तीन फुटाचे शिवलिंग येथे स्थापित करतात. मंदिरात विशाल नंदी असून त्याची उंची ३५ फुट आणि रुंदी ४० फुट आहे.
शिवलिंगाच्या कडेने देवी, गणेश, कुमारस्वामी, नंदी महाराज यांच्या मूर्ती अश्या प्रकारे आहेत की त्या जणू शिवलिंगाची पूजा करत आहेत असे वाटते. मंदिर परिसरात मुख्य मंदिराशिवाय ११ मंदिरे आहेत. त्यात पंचमुखी गणपती, रामसीता, अन्नपूर्णा माता यांच्या मंदिरांचा समावेश आहे. मंदिर परिसरात दोन वृक्ष आहेत. त्याला पिवळा धागा बांधून भाविक त्यांची मनोकामना व्यक्त करतात ती पूर्ण होते असा विश्वास आहे. जगभरातून या मंदिरात लोक येतात.