कांगो मध्ये सापडला सोन्याचा डोंगर, सोने लुटायला जमली गर्दी

सोने चांदी या मौल्यवान धातूबद्दल जगभरात क्रेझ आहे आणि सोन्याचांदीचे भाव नेहमीच बाजारात चर्चेत असतात. या परिस्थितीत एखाद्या ठिकाणी सोन्याचा डोंगर सापडला तर तेथील स्थानिक काय करतील असा विचार मनात येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आफ्रिकेतील कांगो या देशात असा सोन्याचा डोंगर सापडला आहे. हे सोने लुटण्यासाठी स्थानिकांनी कुदळी फावडे घेऊन एकच गर्दी केल्याचे आणि डोंगरावरील सोने मिश्रित माती पिशव्या, शर्ट, अंगावरचे कपडे, पोती, गोण्या मधून भरून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लुहिनी गावात सापडलेल्या या डोंगरावर झालेली गर्दी पाहून येथील प्रशासनाने अखेर येथे प्रवेश बंदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या डोंगरावरील मातीत ६० ते ९० टक्के सोने आहे. मुळात कांगो हे खनिज संपत्तीने समृद्ध असून येथे तेल, हिरे, खनिजे आणि अनेक प्रकारचे लाकूड यांचे मोठे भांडार आहे. या देशात सोन्याच्या खाणी ही सर्वसामान्य बाब आहे. देशाच्या अनेक भागात सोने सापडते. येथील सर्वसामान्य रहिवासी सोने खोदकाम करून उपजीविका करतात. येथे सोने खोदकाम हा कुटिरोद्योग आहे.

लुहिनी गावात सापडलेल्या सोन्याच्या डोंगरावर प्रचंड गर्दी झाल्याने तेथे प्रवेश बंदी करून नियंत्रणासाठी सेना बोलावली गेल्याचे समजते. प्रशासनातील अधिकारी सांगतात, प्रथम या मातीची तपासणी करून, खोदाई करणाऱ्यांच्या रीतसर नोंदण्या करून मग येथे खोदकामाला परवानगी दिली जाईल.

विशेष म्हणजे या देशात सोन्याची प्रचंड भांडारे असूनही देशाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. याचे कारण म्हणजे खोदकामात मिळणारे सोने मोठ्या प्रमाणावर तस्करी करून शेजारी राष्ट्रात, जगातील बाजारात पाठविले जाते. त्यामुळे त्यातून सरकारला फायदा होत नाही. देशात महागाई ही नेहमीची बाब आहे.