तब्बल ५१० कोटींना दोन महिलांनी विकत घेतले खेड्यातील दारुचे दुकान


जयपूर – सध्या राजस्थानमध्ये एका छोट्याश्या गावातील दारुचे दुकान फारच चर्चेत आहे. या चर्चेमागे या दुकानाचा लिलाव करण्यात आला असून त्याला काही शे कोटींची बोली लावण्यात आल्याचे कारण आहे. सकाळी ११ वाजता राजस्थानमधील हनुमानगढ येथील दारुच्या दुकानासाठी लिलाव सुरु झाला आणि तो तब्बल १२ तासांहून अधिक म्हणजेच मध्यरात्रीनंतरही सुरु होता. काही लांखांपासून सुरु झालेली ही बोली अगदी दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता म्हणजेच १५ तासांनंतर संपली.

या दारुच्या दुकानाचा लिलाव ७२ लाखांपासून सुरु झाला. तब्बल १५ तास चालेल्या या लिलावामध्ये प्रत्येकजण एकाहून एक वरचढ बोली लावत होता. यासंदर्भातील वृत्त आजतकने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अखेर ५१० कोटी रुपयांची बोली या दुकानासाठी लावण्यात आली आणि लिलाव पूर्ण झाला. एकाच कुटुंबातील दोन महिलांनी हे दुकान विकत घेतले आहे. यापैकी एका महिलेचे नाव किरण कनवार आहे. राजस्थानमध्ये सध्या उत्पादन शुल्क विभागाकडून सामान्यपणे दारुच्या दुकानांचा लिलाव करण्यात येतो. याच लिलावाचा भाग म्हणून या दुकानावर बोली लावण्यात आली आणि त्याला तब्बल ५१० कोटींची किंमत मिळाली. या दुकानासाठी एवढी मोठी किंमत मिळेल, अशी कल्पनाही विभागाच्या अधिकाऱ्यांनाही नव्हती. त्यामुळे ही रक्कम ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा लिलाव संपल्यानंतर आता पुढील हलचाली सुरु केल्या आहेत. या दुकानाच्या किंमतीच्या दोन टक्के रक्कम कनवार कुटुंबियांना तातडीने उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. या दुकानाला मागील वर्षी लिलावामध्ये ६५ लाखांची किंमत मिळाली होती म्हणून यंदा ७० लाखांपासून या दुकानाचा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दारुच्या दुकांनांचा लिलाव ही राजस्थानमध्ये सामान्य गोष्ट आहे. सध्या सात हजार ६६५ ठिकाणी व्ह्यच्यूअल बिडिंगच्या माध्यमातून लिलाव सुरु आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही लिलाव पद्धत बंद केली होती. पण ही पद्धत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा सुरु केली आहे.