पालकमंत्र्यांनी दिले मुंबईत लवकरच अशंतः लॉकडाउन लागू होण्याचे संकेत


मुंबई – कोरोनाचा उद्रेक राज्यातील इतर भागांबरोबरच मुंबईतही होताना दिसत आहे. मुंबईत दररोज १ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागासमोरील आव्हान अजूनच कठीण झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अशंतः लॉकडाउन वा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पण, आता मुंबईतही अंशतः लॉकडाउन लागू होण्याची शक्यता असल्याचे संकेत पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.

अस्लम शेख यांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोना प्रादुर्भाव पुढील आठ ते दहा दिवसांत नियंत्रणात आले नाही, तर अंशतः लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो, असे सूचक वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असलेल्या मुंबईत रविवारी १,३६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर शनिवारी १,१८८ रुग्ण आढळून आले होते. २४ तासांतच मुंबईत दोनपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर नवे आव्हान उभे राहत असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रविवारी (७ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. मागील आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शनिवार या सहा दिवसांमध्ये राज्यात ५३,५१६ नव्या रुग्णांचे निदान झाले. हाच कल कायम राहिल्यास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकते. गेल्या तीन दिवसांमध्ये प्रतिदिन १० हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

महिन्याभरात राज्यात बाधितांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दररोज सरासरी ६१ हजार चाचण्या केल्या जात होत्या. बाधितांचे प्रमाणही सरासरी पावणेपाच टक्के होते. मार्चमध्ये चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून पहिल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ८२ हजार चाचण्या केल्या गेल्या. त्यांतून बाधितांचे प्रमाण सरासरी दहा टक्के आढळले आहे.