कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर लसही निष्प्रभ ठरण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांना भीती


न्युयॉर्क – कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत चिंता वाढवणारी माहिती रोज नव्याने समोर येत आहे. ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या कोरोनाचे बदलेले स्वरुप म्हणजेच म्युटेड व्हेरिएंट अमेरिकेमधील ओरिगॉन येथे आढळून आले आहे. ब्रिटनमधील व्हायरसपेक्षा हा व्हायरस अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन वेगवेगळ्या विषाणूंमधील रचना एकत्र येत या व्हायरसची रचना ही झाली असल्यामुळे यावर कोरोनाच्या लसीचा फारसा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्हायरससंदर्भात सर्वांनीच अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. हा व्हायरस वेगाने पसरण्याबरोबरच सतत त्यामध्ये बदल होत असल्याने यावर लस निष्प्रभ ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन वेगळ्या व्हायरसमधील रचनेपासून नव्याने तयार झालेली रचना असणाऱ्या व्हायरसचा संसर्ग झालेला एकच रुग्ण आढळून आला आहे. पण जेनेटिक्समधील तज्ज्ञांच्या यासंदर्भात सांगण्यानुसार या व्हायरसचा आधीपासूनच फैलाव सुरु झाला आहे. एकाच रुग्णात हा व्हायरस तयार झालेला नाही. ओरिगॉन हेल्थ अ‍ॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीचे ब्रायन ओ रॉक यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, जगातील इतर भागांमधून हा व्हायरस येथे आलेला नाही. तर अचानक या नव्या प्रकारच्या व्हायरसचा शोध लागला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनची रॉक आणि त्यांचे सहकारी या नव्या व्हेरिएंटची निर्मिती कशी झाली यासंदर्भात मदत करत आहेत. रॉक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी संस्थांसोबत या संशोधना संदर्भातील माहिती शेअर केली आहे.

अमेरिकेमध्ये वेगाने ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी वन वन वन सेव्हन या व्हायरसचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. हा नवा व्हायरस सामान्य कोरोना व्हायरसपेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच नव्या व्हायरसमुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्युटेशन म्हणजेच बदल ओरिगॉनमध्ये आढळून आलेल्या या नव्या प्रकारच्या व्हायरसमध्येही आढळून आला आहे. हा बदल दक्षिण आफ्रीका, ब्राझील आणि न्यूयॉर्क शहरामध्ये पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमध्येही आढळून आला होता.

ईईके म्युटेशनमध्ये रोगप्रतिकारशक्तीला नुकसान पोहचत असल्याचे दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या क्लीनिकल ट्रायल्समध्ये दिसून आले. सध्याच्या कोरोना लसीचा प्रभाव हा व्हायरस कमी करतो, असेही यात दिसून आले. कोरोनाची लस प्रभावशाली ठरणार असली तरी तिचा प्रभाव या नवीन व्हायरसविरोधात तुलनेने कमी असेल. त्यामुळेच फाइजर-बायोएनटेक तसेच मॉडर्ना कंपनीने नव्या लसीच्या चाचण्याही सुरु केल्या आहेत. ब्रिटनमधील ईईकेसोबत बी वन वन सेव्हनचे म्युटेशन दिसून आल्यामुळे संशोधक हा बाब चिंताजनक असल्याचे सांगत आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार ओरिगॉनमधील नवा व्हायरस हा येथेच निर्माण झालेला आहे.

एकाच वेळी अशाप्रकारे दोन वेगळ्या विषाणूंमधील म्युटेशन दिसून नवा व्हायरस निर्माण होणे हे आश्चर्यकारक असल्याचे संशोधक सांगतात. कारण जगभरातील सर्वच विषाणूंमध्ये ईईके म्युटेशन पहायला मिळत आहे. पण बी वन वन सेव्हनचे म्युटेशन हे नव्याने आढळून आले आहे. ब्रिटनमध्ये आधी कमी रुग्ण सापडले. पण म्युटेशननंतर देशभरामध्ये हा व्हायरसचा फैलाव झाल्याचे पाहायला मिळाले. तज्ज्ञांनी या नव्या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नसल्याचे सांगत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.