बीजोत्सव सोहळ्यापुर्वीच देहूगाव ठरू पाहत आहे कोरोनाचे हॉटस्पॉट


पुणे : अवघ्या काही दिवसांवर श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा येऊन ठेपला असतानाच देहूगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. येथील गाथा मंदिराच्या आवारात गेल्या तीन ते चार दिवसांत १८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून देहूतील विविध भागात ३४ रुग्ण आढळल्यामुळे देहूगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून येथे तातडीने उपाय योजना करण्याची गरज आहे.

नव्यानेच देहूगावमध्ये नगरपंचायत स्थापन झाली असून नगरपंचायतीचा आरोग्य विभागच अद्याप स्थापन झालेला नसल्यामुळे त्यांना सध्या तरी जिल्हा परिषदेच्या सहकार्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पण जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून आर्थिक मदत व कर्मचारी वर्ग उपलब्धतेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे देहूकरांना सध्या अडचणींना सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर नागरिकांनांच स्वताची काळजी घ्यावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसात देहूगाव येथे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. सध्या देहूत 40 कोरोनाबाधित असून त्यातील 26 जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. येथील गाथा मंदिरात काही लोक विविध कामासाठी नेमलेले आहेत. शिवाय येथे वारकरी प्रशिक्षण केंद्रही चालविले जाते.

येथील एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आली व मंदिरातील त्याच्या संपर्कातील 72 जणांची तपासणी करण्यात आली असता, 72 पैकी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांचे तेथेच गृहविलगीकरण करण्यात आले आहे. इतर रुग्णांमध्ये सध्या पिंपरी चिंचवड मधील कोव्हिड सेंटरमध्ये 7, तर 8 जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे येथील प्रशासक तहसिलदार मधुसुन बर्गे यांनी देहूगावत मायक्रो कंटेमेंट झोन जाहीर करण्यासंदर्भात हवेली प्रांत यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. यामध्ये चव्हाणनगर भाग २, गाथा मंदिर, आद्यराही सोसायटी, श्रीकृष्ण मंदिर आश्रम, काळोखे वाडा हे भाग मायक्रो झोन म्हणून जाहीर करावेत म्हणून प्रशासकांकडून प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी दिली.

देहूतील सुपर स्प्रेडर लोकांची तात्काळ तपासणी मोहीम हवेली पंचायत समिती व जिल्हा परिषदेने हाती घेवून सहकार्य करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. त्याच प्रमाणे गावातील कोव्हिड सेंटर सुरू करण्यासंदर्भातील ताताडीने निर्णय घ्यावा व तेथे रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टची व्यवस्था करावी किंवा इतर खाजगी रुग्णालयात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देता येईल काय याचाही विचार करणे आवश्यक आहे.