एका शिक्षकासोबत Amazon संस्थापकाच्या पत्नीने केले दुसरे लग्न


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अ‍ॅमेझॉनचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून मिळालेल्या संपत्तीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या जेफ यांच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट पुन्हा चर्चेत आहेत. मॅकेन्झी यांनी केलेले दुसरं लग्न या चर्चेचे कारण आहे. अमेरिकेतील सिअ‍ॅटलमधील एका शाळेत शिक्षक असणाऱ्या डॅन जेवेट यांच्याशी मॅकेन्झी यांनी लग्न केले आहे.

डॅन यांनीच एका चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाइटवरुन मॅकेन्झीसोबत आपण विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली आहे. सिअ‍ॅटलमधील शाळेत डॅन जेवेट हे विज्ञानाचे शिक्षक आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डॅन हे ज्या शाळेत शिकवायचे तिथेच मॅकेन्झी यांची मुले शिक्षण घेत आहेत.

डॅन आणि मॅकेन्झी यांची पहिल्यांदा भेट मुलांच्या निमित्ताने झाल्याचे सांगण्यात येते. डॅन जेवेट यांच्याशी लग्न केल्यानंतर मॅकेन्झी यांचे अ‍ॅमेझॉनवरील बायोग्राफी पेजही अपडेट करण्यात आले आहे. यामध्ये आता मॅकेन्झी या त्यांचे पती डॅन आणि चार मुलांसोबत सिअ‍ॅटलमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जगातील सगळ्यात खर्चीक घटस्फोटानंतर २२ व्या स्थानी असणाऱ्या मॅकेन्झी यांनी सर्वाधिक पैसा दान म्हणून देण्याचाही नवा विक्रमही केला आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून मॅकेन्झी बेझोस यांना ३८.३ अब्ज डॉलर (सुमारे २५ लाख कोटी रुपये) देण्यात आले होते. २५ वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

२०२० च्या शेवटच्या चार महिन्यांमध्ये मॅकेन्झी स्कॉट यांनी ४२० कोटी डॉलर (अंदाजे ३० हजार ६६० कोटी रुपये) ३८४ संस्थांना दान म्हणून दिले आहेत. अमेरिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून महिला, दारिद्रय रेषेखालील गरीबांसाठी काम करणाऱ्यांना संस्थांना मॅकेन्झी यांनी हा पैसा दान केला आहे.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार मॅकेन्झी यांची सपत्ती २०२० साली २३.६ अब्ज डॉलर्सवरुन वाढून ६०.७ अब्ज डॉलर्सपर्यंत गेली. अ‍ॅमेझॉन इंकच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने मॅकेन्झी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावर्षी मॅकेन्झी यांनी आतापर्यंत सहा अब्ज डॉलर्स दान केले आहेत. खास करुन कोरोना काळामध्ये त्यांनी मोठ्याप्रमाणात पैसा दान केला आहे.