ट्विटर सीईओ डोरसी यांच्या पहिल्या ट्विटला १८.२ कोटींची बोली?

ट्विटर या सोशल मिडिया साईटचे सीईओ जॅॅक डोरसी यांचे पाहिले ट्विट विक्रीसाठी आले असून रविवारी त्याला १८.२ कोटींची बोली लागल्याचे सांगितले जात आहे. मलेशियन कंपनी ब्रीज ओरॅकलच्या सीईओ सीना इस्तावी यांनी या किमतीची बोली लावली आहे. हे ट्विट क्रिप्टोकरन्सी रुपात विकले जात असल्याची घोषणा केली गेली आहे. नॉन फिजीबल टोकन एनएफटी साठी बिडिंग लिंक सह ‘व्हॅल्युएबल्स’ नावाच्या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या संबंधी ट्विट केले गेले आहे. या माध्यमातून वस्तू विक्री करणारा त्या वस्तूचा एकटाच मालक असतो आणि जे ग्राहक ही खरेदी करेल तो ते पुन्हा विकू शकतो किंवा वाटू शकतो.

या ट्विटच्या विक्री संदर्भात खुद्द डोरसी यांनीच ट्विट करून ते विक्रीला आल्याचे सांगितले आहे असे व्हॅल्युएबल प्लॅटफ्रॉमचे म्हणणे आहे. ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विट’ असे एका ओळीचे हे ट्विट डोरसी यांनी ६ मार्च २००६ रोजी म्हणजे सुमारे १५ वर्षांपूर्वी केले होते आणि ते सार्वजनिक स्वरुपात मोफत उपलब्ध आहे. व्हॅल्युएबल च्या म्हणण्यानुसार ग्राहक खरेदी करणार असलेले हे ट्विट म्हणजे एक डिजिटल प्रमाणपत्र असून ते अद्वितीय आहे. कारण निर्मात्याने हे हस्ताक्षरीत केले आहे.

वास्तविक गेल्या डिसेंबर मध्येच हे ट्विट विक्रीसाठी उपलब्ध केले गेले होते मात्र डोरसी यांनी त्या संदर्भात ट्विट केल्यानंतरच त्याची माहिती लोकांना मिळाली. या प्रकारच्या विक्रीतून मिळणारया किमतीच्या ९५ टक्के रक्कम क्रिएटर म्हणजे संबंधित वस्तूच्या निर्मात्याला दिली जाते आणि ५ टक्के रक्कम वेबसाईटला मिळते. ही वस्तू पुन्हा विक्रीला आली तर त्यावेळच्या मालकाला ८७.५ टक्के, क्रिएटर ला १० टक्के आणि वेबसाईटला २.५ टक्के रक्कम मिळते असे सांगितले जाते.