कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्याचे आदेश


नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सर्व पक्षीयांच्या प्रचाराला आता आणखी वेग आला आहे. दुसरीकडे देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. या गोष्टीवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घेत केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले आहे.

अलिकडेच पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पाचही राज्यांतील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्र ०२ मे रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला काही आदेश दिले आहेत.

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, कोरोना लस घेतलेल्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, तेथील कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकार आचार संहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाकडून तो आरोप फेटाळण्यात आला आहे.