देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनासाठी मोदी अध्यक्षतेखाली समिती स्थापन

देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे होत असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेसाठी २५९ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, मायावती यांचा समावेश असल्याचे समजते. या समितीत २८ राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, बहुतेक सर्व केंद्रीय मंत्री सामील आहेतच पण त्याचबरोबर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सरन्यायाधीश शरद बोबडे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल,, लता मंगेशकर, अर्थतज्ञ अमर्त्य सेन, माजी उपपंतप्रधान भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांचाही समावेश आहे.

अन्य सदस्यात मुलायमसिंग यादव, सीताराम येचुरी, शरद पवार यांचा समावेश आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने या कार्यक्रमाची रूपरेखा ठरविली आहे आणि ही उच्चस्तरीय समिती त्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. १५ ऑगस्ट २०२२ च्या ७५ आठवडे अगोदर म्हणजे १२ मार्च २०२१ पासून कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याच दिवशी म. गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहाला ९१ वर्षे पूर्ण होणार आहेत. या समितीची पहिली बैठक ८ मार्च रोजी होणार आहे.