टोक्यो ऑलिम्पिकच्या मशाल रॅलीत धावण्याची ११७ वर्षाच्या आजीची इच्छा

खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा या वर्षी जुलाई ऑगस्ट मध्ये जपान येथे होत आहेत. त्यासाठी २५ मार्चला मशाल रॅली होत असून या रॅलित धावण्याची इच्छा जगातील सर्वात वयोवृध्द जपानी महिला केन तानाका हिने व्यक्त केली आहे. तानाका ११८ वर्षांची असून ती १०० मीटर स्पर्धेत सामील होणार आहे. व्हीलचेअर बसून ती रॅलीत सहभागी होईल आणि ऑलिम्पिक ज्योत हातात धरेल. तानाकाने ही ज्योत दुसऱ्या खेळाडूकडे सोपविताना मात्र काही अंतर धावण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तानाकाचा नातू ईजी या बाबत म्हणाला की रॅलीतील तानाकाचा सहभाग त्यावेळची तिची तब्येत आणि हवामानावर अवलंबून आहे. जानेवारी २०२० मध्ये तिने ११७ वा वाढदिवस साजरा केला आहे, गिनीज बुक मध्ये सर्वाधिक वयाच्या व्यक्तीची नोंद फ्रांसच्या दिवंगत जेनी लुईस कार्लो हिच्या नावावर असून तिचे वय १२२ वर्षे १६४ दिवस होते. ती १९९७ साली दिवंगत झाली असून सध्या जगात सर्वाधिक वयाची नोंद तानाका हिची आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा गतवर्षीच होणार होत्या मात्र करोना मुळे त्या पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. आयोजन समितीचे नवे अध्यक्ष सेको हशिमोतो यांनी या स्पर्धा सुरक्षित वातावरणात संपन्न होतील असे सांगितले आहे. जपान मध्ये जनमत चाचणीत ८० टक्के नागरिकांनी या स्पर्धा स्थगित कराव्या असा कौल दिला होता. २५ मार्च च्या मशाल रॅलीत १० हजार धावपटू भाग घेणार असून जपानच्या सर्व भागातून ही रॅली जाणार आहे.