‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालातील निष्कर्ष भाजप खासदाराने फेटाळले


नवी दिल्ली – भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून ऱ्हास सुरू झाला असून, वॉशिंग्टनमधील ‘फ्रीडम हाऊस’ या जागतिक स्तरावरील संस्थेने भारतातील वातावरण ‘मुक्त’पासून ते ‘अंशत: मुक्त’ अशा स्थितीपर्यंत घसरले असल्याचा अहवाल दिला. आता मोदी सरकारवर या अहवालावरून टीका होताना दिसत आहे. पण, या अहवालातील निष्कर्ष भाजपच्या खासदाराने फेटाळून लावले आहेत. भारतविरोधी कटाचाच ‘फ्रीडम हाऊस’चा अहवाल भाग असल्याचा दावा भाजप खासदार प्रा. राकेश सिन्हा यांनी केला आहे.

अनेक मुद्द्यांचा संदर्भ ‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालात दिला आहे. या अहवालात सर्वात मुक्त वातावरण असलेल्या देशासाठी एकूण १०० गुण आहेत. यात भारताचे गुण ७१ वरून ६७ वर एवढे घसरले आहेत. खासदार सिन्हा यांनी ‘बीबीसी हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत या अहवालाविषयी भूमिका मांडली आहे. हे साम्राज्यवादी षडयंत्र आहे. भौगोलिक साम्राज्यवाद संपला असला, तरी वैचारिक साम्राज्यवाद अजूनही तसाच असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतात आल्यानंतर लोक पूर्ण स्वातंत्र्यानिशी सरकारी धोरणांवर आणि न्यायव्यवस्थेवर टीका करू शकत आहेत. पण, पश्चिमेकडील (अमेरिका) एक शक्ती भारताची स्वतःच्या नजरेतून मांडणी करत असल्यामुळेच हा अहवाल पूर्णपणे भारतविरोधी कटाचा भाग आहे. त्यांची दृष्टी किती दूषित आहे, हे यातून दिसते. भारतात दररोज शेकडो टीव्ही चॅनेल स्वतंत्रपणे वादविवाद, चर्चो होते. वृत्तपत्रांवर कोणतेही नियंत्रण नाही. सोशल मीडियालाही पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मग हे स्वातंत्र्य नाही, तर आणखी काय आहे?, असा सवालही सिन्हा यांनी ‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालावर टीका करताना उपस्थित केला आहे.