सर्वोच्च न्यायालयाचा अॅमेझॉन प्राईमच्या कंटेंट हेडला दिलासा


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज तांडव वेब सीरिजमुळे सुरु असेल्या विवाद प्रकरणी सुनावणी पार पडली. या दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारला अॅमेझॉन प्राईम कंटेंड हेड अपर्णा पुरोहित यांच्या याचिकेवर नोटीस जारी करण्यात आली आहे. तांडवसाठी लखनौमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासात अपर्णा यांना सर्वोच्च न्यायालयाने सहकार्य करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांना दिलासाही दिला असून सध्या त्यांची अटक टळली आहे.

दरम्यान, देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अॅमेझॉन प्राईमवर दाखवण्यात आलेली वेब सीरिज ‘तांडव’बाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लखनौमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी अपर्णा पुरोहित यांनी मागणी केली होती. पण, उच्च न्यायालयाने अपर्णा यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे त्यांना तांडव वेब सीरिजमुळे सुरु असेल्या विवादा प्रकरणी अटक होण्याची शक्यता होती. त्यानंतर मात्र अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, ओटीटी प्लेटफॉर्मच्या कटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांवरही भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, योग्य कायदा समंत केल्याशिवाय यावर नियंत्रण ठेवता येणे अशक्य आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, 2 आठवड्यांमध्ये कायद्याचा आराखडा सरकार सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे.