अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप


मुंबई – विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरुन गंभीर आरोप केले असून देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शंकेला वाव देणारे अनेक पुरावे समोर आले असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच फडणवीसांनी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा उल्लेख करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ ही कार रोडवर उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या सापडल्या होत्या.

एक गाडी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली. संशय निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

धमकीचे पत्र वाचून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, दोन गाड्या त्या ठिकाणी आल्या होत्या. एकाच मार्गाने या दोन्ही गाड्या आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. पोलीस अधिकारी सचिन वझे गाडी ओळखल्याबरोबर पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वझे यांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वझेंना का काढले? हे समजले नाही.

ते पुढे म्हणाले की, योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली, त्यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. तो नंबर सचिन वझे यांचा असल्याचे समोर आले आहे. गाडी ज्या दिवशी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. कोणाला तो भेटला, हे जर काढले तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचे रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे ओला कॅब चालकाने पाहिले आहे. अशा परिस्थितीत वझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वझे गाडी दिसल्याबरोबर तिथे पोहोचले. धमकीचे पत्रही सचिन वझे यांना प्राप्त झाले. ते त्यांनीच टेलीग्रामवर टाकले. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.