सचिन वझे यांनी फेटाळले देवेंद्र फडणवीसांचे आरोप


मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ जी स्कॉर्पिओ कार स्फोटकांसह पार्क करण्यात आली होती, त्या कारच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर संशय घेताना याप्रकरणी सुरुवातीला तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले सचिन वझे यांचे नाव घेऊन काही प्रश्न उपस्थित केले असून त्यावर वझे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जिलेटिनच्या २० कांड्या अंबानी यांच्या घराजवळ ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडल्या होत्या, ती कार ठाण्यातील मनसुख हिरेन या व्यक्तीची असल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. पोलिसांचा तपासही या प्रकरणी सुरू आहे. दरम्यान, आज अचानक मुंब्रा खाडीत मनसुख यांचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

विक्रोळी येथे मनसुख हिरेन यांची ही गाडी बंद पडली होती. त्यानंतर तिथून ओलाने ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले ती व्यक्ती कोण होती? ही गाडी अंबानी यांच्या घराजवळ सापडली, तेव्हा तिथे सचिन वझे स्थानिक पोलिसांच्या आधीही कसे पोहचले?, धमकीची चिठ्ठी त्यांनाच कशी मिळाली?, असे प्रश्न उपस्थित करताना मनसुख हिरेन आणि सचिन वझे यांच्यात ८ जून २०२० पासून अनेकदा फोनवर संभाषण झाल्याचे दिसत आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्याचवेळी हा सारा घटनाक्रमक संशयास्पद असून याप्रकरणी एनआयए मार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

सचिन वझे यांची फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता फडणवीस यांचे आरोप फेटाळत त्यांनी काही बाबींवर प्रकाश टाकला. मनसुख हिरेन प्रकरणाबाबात मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच निघाल्याचे वझे म्हणाले.

तीन दिवसांपूर्वी ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना मनसुख यांनी एक लेखी तक्रार दिली होती. त्यात पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याने मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी नमूद केले होते. रात्री उशिरा एका पत्रकाराने फोन करून पोलीस तुमच्याकडे संशयित म्हणून पाहत असल्याचेही तक्रारीत त्यांनी म्हटले होते, असे माझ्या कानावर आले आहे, असे वझे यांनी सांगितले. तुमचे आणि हिरेन याचं याआधी अनेकदा बोलणे झाले असा दावा फडणवीस यांनी केला आहे, असे विचारले असता त्यांनी तसे बोलू देत. त्याबाबत तेच तुम्हाला सागू शकतील, असे त्रोटक उत्तर वझे यांनी दिले.

फडणवीसांचा वझे सर्वात आधी घटनास्थळी पोहचल्याचा दावाही त्यांनी फेटाळला. घटनास्थळी मी पहिला गेलो नाही. सर्वात आधी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस, नंतर परिमंडळ दोनचे उपायुक्त आणि त्यांच्या पाठोपाठ क्राइम ब्रॅन्चची टीम तिथे पोहचली. मी त्यात होतो, असे वझे म्हणाले. वझे हे अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सुरुवातीला तपास अधिकारी होते. वझे यांनी हिरेन यांचा जबाब नोंदवला होता. त्याबाबत विचारले असता त्यांनी कोणताही तपशील दिला नाही.