दमदार शतक झळकावत रिषभने दिला भारताच्या डावाला आकार; दिवसअखेर भारत ७ बाद २९४


अहमदाबाद – चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतने अवघ्या ११७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकत भारताच्या डावाला आकार दिला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर देखील एका बाजूने रिषभ पंतने तंबू ठोकून धावा जमवायला सुरुवात केली. धिम्या गतीने खेळत अर्धशकत पूर्ण करणाऱ्या रिषभ पंतने पुढच्या ५० धावा वेगाने पूर्ण केल्या. पण, रिषभ पंत अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

रिषभ पंत बाद झाल्यानंतर टीम इंडिया फार लांब जाऊ शकणार नाही, असे वाटत असतानाच अक्षर पटेलला हाताशी धरून वॉशिंग्टन सुंदरने धावफलक हलता ठेवला. वॉशिंग्टन सुंदरने ११७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने ७ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताकडे ८९ धावांची आघाडी आली आहे. वॉशिंग्टन सुंदर नाबाद ६० तर अक्षर पटेल नाबाद ११ धावांवर खेळत आहेत.

पाहुण्यांचा आख्खा संघ पहिल्या दिवसात अवघ्या २०० धावांवर गारद झाल्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाचीही भोपळाही न फोडता पहिली विकेट पडली. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत संघाच्या फक्त ८० धावा फलकावर लागलेल्या असताना भारताची वरची फळी तंबूत परतली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पुजारा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात देखील केली. पण कालच्या धावसंख्येमध्ये फक्त १६ धावांची भर घालून पुजारा वैयक्तिक १७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. रोहित शर्माने भरवशाच्या अजिंक्य रहाणेला साथीला घेऊन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे देखील २७ धावांवर अँडरसनची शिकार ठरला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आलेल्या रिषभ पंतला साथीला घेऊन एक बाजू लावून धरणाऱ्या रोहित शर्माने डावाला आकार दिला. ही जोडी स्थिरावत असल्याचे वाटत असतानाच वैयक्तिक ४९ धावसंख्येवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचीत झाला.