राज ठाकरेंनी नाशिकच्या माजी महापौरांना काढायला लावला मास्क


नाशिक : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असून त्याच पार्श्वभूमिवर सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असे असताना जागोजागी विना मास्क मनसे प्रमुख राज ठाकरे फिरत असल्याचे दिसून येत आहेत. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून आले. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना ‘मास्क काढा’ अशा सूचनाही दिल्या.

राज ठाकरे आज नाशिकमध्ये असून नाशिकमध्ये ते आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले. यावेळी बुके देऊन स्वागत करताना राज ठाकरे यांनी त्यांना इशारा करत मास्क काढण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वीही अनेक ठिकाणी राज ठाकरे यांनी विनामास्क हजेरी लावल्याचे समोर आले होते. तसंच मी मास्क घालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते.

राज ठाकरे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला देखील विनामास्क उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी म्हटले होते की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथे धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढे जर कोरोनाचे संकट पुन्हा येत असल्याचे दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असे राज ठाकरे म्हणाले.