सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल


नवी दिल्ली – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाने बदल केला आहे. शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात असून सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे.

महत्त्वाचे बदल वेळापत्रकात करण्यात आले आहेत. यानुसार बारावीचा १३ मे रोजी असणारा फिजिक्स पेपर आता सुधारित वेळापत्रकानुसार ८ जून रोजी घेतला जाईल. याशिवाय इतिहास आणि बँकिंग विषयाच्या परीक्षांमध्येही बदल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दहावीचा विज्ञान आणि गणित विषयांच्या पेपरच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार दहावीचा सायन्सचा पेपर २१ मे आणि गणिताचा पेपर २ जून रोजी होईल. त्याचबरोबर बोर्डाने कला शाखेसाठीही वेळापत्रकात बदल केला आहे. यानुसार, आधी २ जून रोजी असणारा भूगोलाचा पेपर आता ३ जूनला घेतला जाणार आहे.

४ मे पासून सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षा सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा ७ जून तर बारावीची परीक्षा ११ जून रोजी संपणार आहे. बोर्डाने १ मार्चपासून शाळांद्वारे प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजनही केले आहे. दरम्यान अभ्यासक्रमात ३० टक्के कपात सीबीएसई बोर्डाने केली आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे बहुतांश शाळा गेले वर्षभर ऑनलाइन सुरू होत्या परिणामी विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अभ्यासक्रम कपात करण्यात आली आहे. ३३ टक्के प्रश्न परीक्षेत इंटरनल चॉइस प्रकारचे असतील. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून परीक्षेला हजर राहताना विद्यार्थ्यांनी कोरोना सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे. १५ जुलैपर्यंत परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत.

दहावीच्या सुधारित वेळापत्रकाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
बारावीच्या सुधारित वेळापत्रकाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.