अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह रेतीबंदर खाडीत आढळला


मुंबई: काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असतानाच, ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ एक स्कॉर्पियो गाडी आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही गाडी कुणाची आहे, याची माहिती उघड झाली होती. या गाडीचे मनसुख हिरेन हे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते. त्यांनी पोलिसांना गाडी चोरीला गेल्याची माहिती दिली होती. पण, आता मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्रीपासून मनसुख हे बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारही दिली होती. त्याचा तपास सुरू असतानाच, त्यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला. मनसुख हिरेन यांचा ठाण्यात कार डेकोरचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यक्रमांत ते नेहमी भाग घेत होते. त्यांची पत्नी विमला हिरेन या सुद्धा सामाजिक कार्यकर्ता आहेत, अशी माहिती समजते.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात मनसुख हे महत्वाची व्यक्ती होती. त्यांना तात्काळ संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी मी केली होती. हे पूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला पाहिजे. अशी मागणी मी काही वेळापूर्वी विधानसभेत केल्याचे ते म्हणाले.