जगात सर्वात स्वस्त इंटरनेट मिळते भारतात

जगभरात इंटरनेट साठी आकारण्यात येणाऱ्या दरांचा विचार केला तर भारतात इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असल्याचे दिसून आले आहे. सर्वात महाग इंटरनेट सेवा द. अटलांटिक महासागरातील आफ्रिकी देश सेंट हेलेना येथे आहे. भारतात १ जीबी इंटरनेट डेटा साठी सरासरी ७ रुपये मोजावे लागतात तर सेंट हेलेना मध्ये त्यासाठी सरासरी ३८३२ रुपये मोजावे लागतात. पाकिस्तान मध्ये हा दर ५०.३७ रुपये असून चीन मध्ये ४४.५३ रुपये आहे.

भारत डिजिटल अॅडॉप्शन मध्ये जगात दोन नंबरवर आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २०१८ मध्ये डिजिटल इकोनोमी २०० अब्ज डॉलर्सची होती आणि हे प्रमाण दरडोई उत्पन्नाच्या ८ टक्के होते असे जाहीर केले होते.२०२५ पर्यंत हे प्रमाण १८ ते २३ टक्क्यांवर जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

यावर्षी इंटरनेट युजर्सनी मोबाईल इंटरनेटवर सरासरी ९३० तास खर्च केले असल्याचे झेनिथ मिडिया कन्झप्शन फॉरकास्टच्या अहवालात नमूद केले गेले आहे. त्यानुसार युजर्स वर्षातल्या ३९ दिवसांइतका वेळ मोबाईल इंटरनेटवर घालवित आहेत. हे सर्व्हेक्षण ५७ देशात केले गेले असून या देशात २०२१ मध्ये ४.५ ट्रिलियन तास मोबाईल इंटरनेटवर युजर्स खर्च करतील असा अंदाज दिला गेला आहे.