धुरांच्या रेषा सोडणाऱ्या झुकझुक गाडीची सफर

मराठी मुलांच्या बालपणी झुकू झुकू झुकू झुकू आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी असे वर्णन असलेल्या मामाच्या गावाला नेणाऱ्या रेल्वेगाडीचे वर्णन असलेले एक गीत फारच लोकप्रिय होते. काळानुसार रेल्वेला अगोदर डिझेलची मग इलेक्ट्रिक इंजिने आली आणि कोळशाच्या धूर सोडत धावणारी ही आगीन गाडी काळाच्या पडद्याआड गेली. पण भारतात आजही एका ठिकाणी अश्या आगीनगाडीची सफर करता येते. तामिळनाडू मध्ये निलगिरी माउंटन रेल्वे अशी एक छोटीशी, चार डब्यांची गाडी कुन्नूर ते उटी या मार्गावर चालविते.

विशेष म्हणजे या गाडीचा ट्रॅक जबरदस्त असून जगभरात तो वेगळाच ट्रॅक म्हणून ओळखला जातो. अतिशय निसर्गरम्य प्रदेशातून, उंच डोंगर रांगा, खोल दऱ्यातून हा मार्ग जातो. युनेस्कोने त्याला जगातील वारसा यादीत सामील केले आहे. हजारो प्रवासी या रेल्वेतून प्रवास करण्यास उत्सुक असतात ही रेल्वे सेवा बरेचदा तोट्यात चालवावी लागते. दोन प्रसिद्ध हिल स्टेशन दरम्यान ही गाडी धावते. हा सारा मार्ग अतिशय अवघड आहे. या प्रवासादरम्यान ही गाडी १० बोगदे आणि २५८ पूल पार करते.

या चिमुकल्या गाडीला चार डबे आहेत आणि त्यातून एका वेळी १८० प्रवासी जाऊ शकतात. या गाडीला स्वीस एक्स क्लास कोळसा इंजिन असून अत्यंत जुन्या इंजिनातील ते एक आहे. या प्रवासात एकूण १३ स्टेशन्स येतात. १९०८ साली हा मार्ग बांधला गेला. आशियातील हा सर्वाधिक उंचीवरचा आणि लांबीचा मीटर गेज मार्ग आहे.